अमरावतीत १८० मुलींना जाळ्यात ओढून ३५० अश्लील व्हिडिओ; ब्लॅकमेलिंग रॅकेटचा पर्दाफाश!

    15-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

अमरावती : अचलपूर–परतवाडा परिसरात उघडकीस आलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ आणि लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी निर्णायक कारवाई करत मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर याला अटक केली असून न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर तरुणींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने या घृणास्पद प्रकाराचा उलगडा झाला. या व्हिडिओंच्या आधारे मुलींना धमकावत त्यांचे शोषण केले जात असल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला भीतीमुळे कोणीही पुढे येत नव्हते, मात्र प्रकरणाची तीव्रता लक्षात घेऊन ग्रामीण पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत तातडीने तपास सुरू केला आणि आरोपीला जेरबंद केले.


या प्रकरणामागे मोठे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. तब्बल १८० हून अधिक मुलींचे सुमारे ३५० आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून त्यांचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी करण्यात येत असल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. काही प्रकरणांमध्ये मुलींना देहव्यापारासाठीही भाग पाडले जात असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्वाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी जोर धरत आहे.


दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, असा इशारा दिला आहे. पोलिसांकडे उपलब्ध पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


पोलिस प्रशासनाने पीडित तरुणींची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मदतीसाठी महिला पोलिसांची विशेष पथके कार्यरत असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास अत्यंत संवेदनशीलतेने आणि वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे.