‘कर्कश्य डीजे, दिखाऊ मिरवणुका नकोत’; आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरे यांचे परखड मत

    14-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण असताना, राज ठाकरे यांनी व्यक्त केलेले विचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत त्यांनी जयंती साजरी करण्याच्या पद्धतीवर भाष्य करत समाजाला विचार करण्यास भाग पाडले आहे.

राज ठाकरे यांनी बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करताना त्यांच्या केवळ सामाजिक नव्हे तर आर्थिक विचारांचीही आठवण करून दिली. ‘रुपयाच्या समस्येवर’ त्यांनी केलेले सखोल संशोधन आणि त्यातून पुढे आलेल्या कल्पना या देशाच्या आर्थिक धोरणांसाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, भारतीय अर्थव्यवस्थेच्या पायाभरणीत बाबासाहेबांचे योगदान मोठे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी सध्याच्या जयंती साजरी करण्याच्या पद्धतीवर टीका करत,“महापुरुषांचे पुतळे उभारणे, त्यांना जातीत विभागणे किंवा त्यांच्या नावावर राजकारण करणे ही खरी आदरांजली नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

तसेच,“जयंत्यांना कर्कश्य डीजे लावून केवळ मिरवणुका काढण्यात काही अर्थ नाही; त्यांच्या विचारांचे पालन झाले तरच खरी श्रद्धांजली ठरेल,” असा टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, आज विकासाची संकल्पना केवळ रस्ते, उड्डाणपूल आणि सरकारी योजनांपुरती मर्यादित झाली आहे. मात्र समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत खऱ्या अर्थाने विकास पोहोचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बाबासाहेबांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची आजही समाजाला गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

शेवटी त्यांनी पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचा संदेश दिला.