
Image Source:(Internet)
मुंबई : गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात भरलेल्या लाइव्ह म्युझिक कार्यक्रमात अमली पदार्थांच्या अति सेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कार्यक्रमाशी संबंधित नेस्को व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
शनिवारी रात्री झालेल्या या कॉन्सर्टला हजारो तरुणांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान काही तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मद्य आणि ड्रग्जचे सेवन केल्याने त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर तातडीने त्यांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
जमुनालाल कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा गोरेगावमधील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका तरुणीने खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला. आणखी एक तरुणी सध्या गंभीर अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर वनराई पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्राथमिक तपासात नेस्कोच्या इव्हेंट व्यवस्थापनातील काही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्यांच्यासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मृत विद्यार्थ्यांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून माहिती देण्यास होत असलेली टाळाटाळ चर्चेचा विषय ठरत असून, शहरातील अमली पदार्थविरोधी कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.