विदर्भात उन्हाचा कहर वाढला; नागपुरात पारा ४१ अंशांच्या पुढे

    13-Apr-2026
Total Views |
 
Heatwave
 Image Source:(Internet)
नागपूर :
एप्रिलच्या उत्तरार्धाची सुरुवात होताच विदर्भात (Vidarbha) उन्हाची झळ अधिकच तीव्र झाली आहे. रविवारी नागपुरात यंदाच्या हंगामातील उच्चांक नोंदवला गेला असून तापमान ४१.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
 
नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात तापमानाने ४० अंशांची मर्यादा ओलांडली आहे. ब्रह्मपुरीचा अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यांत उकाड्याची तीव्रता जाणवत असून नागरिक हैराण झाले आहेत.
 
दरम्यान, अकोल्यात ४३.१ अंश तापमानाची नोंद होऊन ते राज्यातील सर्वाधिक तापमान ठरले, तर अमरावतीतही पारा ४२.४ अंशांवर पोहोचला. त्यामुळे संपूर्ण विदर्भ उष्णतेच्या लाटेत सापडल्याचे चित्र आहे.
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस नागपूर व विदर्भात कोरडे हवामान कायम राहणार असून तापमानात आणखी २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.
 
उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी पिऊन शरीराला थंड ठेवावे आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.