
Image Source:(Internet)
मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशातील शेअर बाजारात तीव्र घसरण नोंदवली गेली. सोमवारी व्यवहाराला सुरुवात होताच विक्रीचा दबाव वाढला आणि मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स सुमारे १,६०० अंकांनी कोसळला. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २३,६०० च्या खाली घसरला.
या अचानक घडलेल्या घसरणीमुळे काही क्षणांतच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास ८ लाख कोटी रुपयांची घट झाली. बाजारातील ही पडझड सर्वच क्षेत्रांमध्ये दिसून आली. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली, तर मध्यम व लहान उद्योगांच्या समभागांतही २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
गेल्या आठवड्यात बाजारात चांगली वाढ झाल्यानंतर ही घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरी वाढल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी नफा सुरक्षित करण्यासाठी विक्री करण्याचा मार्ग स्वीकारला असून बाजारात अस्थिरता वाढली आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावाचाही परिणाम बाजारावर झाला आहे. युनायटेड स्टेट आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आणि चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. त्यामुळे जागतिक अर्थस्थितीबाबत चिंता वाढली आहे.
तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी चायना वर पुन्हा आयात शुल्क लावण्याचे संकेत दिल्याने संभाव्य व्यापार संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.
याचबरोबर कच्च्या तेलाच्या दरातही मोठी वाढ झाली असून तेलाचा दर १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला आहे. भारतासारख्या आयात करणाऱ्या देशांसाठी ही बाब चिंतेची ठरत आहे. तेलाच्या किमती वाढल्यास महागाई वाढण्याची शक्यता असून त्याचा आर्थिक प्रगतीवर परिणाम होऊ शकतो.
एकूणच, या सर्व घडामोडींमुळे सध्या शेअर बाजारात सावध वातावरण निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक परिस्थिती स्थिर होईपर्यंत बाजारातील चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे.