आशा भोसले यांच्या गायनाचा शेवटचा व्हिडीओ चर्चेत;वयाच्या ९२ व्या वर्षीही सुरांची मोहिनी

    13-Apr-2026
Total Views |
 
Asha Bhosle
 Image Source:(Internet)
मुंबई :
भारतीय संगीतसृष्टीतील दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी आपल्या कारकिर्दीत ११ हजारांहून अधिक गाणी गाऊन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या सुरेल आवाजाने अनेक पिढ्यांना भुरळ घातली असून आजही त्यांची गाणी तितक्याच आवडीने ऐकली जातात. विविध शैलींमध्ये सहजतेने गाणं सादर करण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती.
 
वयाच्या ९२ व्या वर्षीही त्यांच्या आवाजातील गोडवा आणि ताकद तशीच कायम असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओतून पुन्हा अधोरेखित झालं आहे. काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी आशा भोसले यांची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान त्यांनी गायलेला हा व्हिडीओ, त्यांच्या निधनानंतर शेलार यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आशाताई शेवटच्यांदा गाताना दिसत आहेत.
 
हा व्हिडीओ शेअर करताना शेलार यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. “जगण्यातील श्रीमंती हरपली,” असे म्हणत त्यांनी आशा भोसले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कलेचा गौरव केला. विविध प्रकारची गाणी—लावणी, भक्तीगीत, अभंग, भावगीत, चित्रपटगीते—यांतून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. २० हून अधिक भाषांमध्ये गायन करत त्यांनी भाषेच्या मर्यादाही ओलांडल्या.
 
तसेच, आयुष्यातील संकटांवर मात करत आनंदाने गाणं सादर करण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी होती. “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती...” सारख्या अजरामर ओवाळणी गीतांनी त्यांनी प्रत्येक सण अधिक भावपूर्ण केला. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
 
 
 
शेवटचं रेकॉर्ड केलेलं गाणंही ठरलं खास-
आशा भोसले यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातही गायन सुरूच ठेवले होते. २०२६ मध्ये त्यांनी एका विशेष संगीतमुद्रिकेसाठी शेवटचं गाणं रेकॉर्ड केलं. ‘द शॅडो लाईट’ या गाण्यासाठी त्यांनी Gorillaz या आंतरराष्ट्रीय संगीत समूहासोबत काम केलं. या गाण्याची निर्मिती Damon Albarn आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती.
 
वयोमानाच्या पुढे जाऊनही सुरांवर असलेली त्यांची पकड आणि समर्पण यामुळेच आशा भोसले यांचं स्थान संगीतविश्वात अढळ राहिलं आहे. त्यांच्या आवाजातील जादू पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.