‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरण गाजत असताना वडेट्टीवारांचा सरकारवर प्रहार; दुहेरी निकषांवर सवाल

    11-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नाशिक : राज्यात चर्चेत असलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणासह ढोंगी बाबा अशोक खरात यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत दुहेरी निकष लावले जात असल्याचा आरोप केला.

वडेट्टीवार म्हणाले, “अशोक खरात यांच्या जागी दुसऱ्या धर्मातील आरोपी असता, तर संपूर्ण समाजाला लक्ष्य करण्यात आलं असतं. गुन्हेगार कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असो, त्याच्याकडे फक्त गुन्हेगार म्हणूनच पाहिलं पाहिजे,” असे मत त्यांनी मांडले.

यासोबतच त्यांनी राज्यातील शेतकरी प्रश्नावरही सरकारला घेरले. कर्जमाफीची घोषणा ही केवळ दिखावा असल्याची टीका करत, “शेतकऱ्यांचा सात-बारा पूर्णपणे कर्जमुक्त झाल्याशिवाय खरी मदत झाल्याचं म्हणता येणार नाही,” असे ते म्हणाले.

पिक विमा योजनेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. या योजनेचा फायदा खासगी विमा कंपन्यांनाच होत असून, आपत्तीग्रस्त शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, विरोधी पक्षातील काही नेते सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, “मतदारसंघाच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांना भेटणं ही नेहमीची बाब आहे.” तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर होणारे ‘वेळ देत नाहीत’ हे आरोपही त्यांनी फेटाळले.

महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता त्यांनी नाकारली असली, तरी काही खासदारांची भूमिका ही त्यांच्या वैयक्तिक निर्णयांवर आधारित असल्याचे त्यांनी सूचित केले.