
Image Source:(Internet)
रायगड : राज्यात दिव्यांग कल्याण विभागातील बदल्यांवरून वातावरण तापलेले असतानाच रायगड जिल्हा परिषदेने दिव्यांगांसाठी दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता’ या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र १,५११ दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी १६ हजार रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.
दरम्यान, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मुंढे यांनी कार्यकाळात दिव्यांगांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या बदलीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणीही होत आहे.
अशा पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या योजनेचा समावेश करून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आहे. या योजनेअंतर्गत ६० टक्के ते ९० टक्क्यांपर्यंत दिव्यंगत्व असलेल्या व्यक्तींना पात्र ठरवण्यात आले आहे. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक अथवा सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तसेच यूडीआयडी प्रमाणपत्र बंधनकारक ठेवण्यात आले होते.
३१ डिसेंबर २०२५ पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून एकूण १,५११ लाभार्थी पात्र ठरवण्यात आले. या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी १६ हजार रुपयांचा निर्वाह भत्ता थेट बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी पात्र लाभार्थ्यांनी आपल्या खात्यात रक्कम जमा झाल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, एकीकडे बदल्यांवरून नाराजी व्यक्त होत असताना दुसरीकडे अशा योजनांमुळे दिव्यांगांना प्रत्यक्ष आर्थिक आधार मिळत असल्याने समाधानही व्यक्त केले जात आहे.