रिक्षाचालकांसाठी मराठी सक्ती; १ मेनंतर नियमभंगावर परवाना रद्द करण्याची कारवाई

    11-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यात रिक्षा चालविणाऱ्या चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय कडकपणे अंमलात आणला जाणार असून, १ मेपर्यंत तपासणी पूर्ण करून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मराठी न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.

राज्यातील अनधिकृत प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. बेकायदा बाइक टॅक्सी सेवांवर कारवाई करत Ola, Uber आणि Rapido यांसारख्या कंपन्यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ठाणे-मिरा भाईंदर परिसरातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी मेट्रो-१० प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गायमुख रेतीबंदर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) या सुमारे ९.७ किमी लांबीच्या उन्नत मेट्रो मार्गासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. काशीगाव ते दहिसर चेक नाका या मार्गाच्या जोडणीनंतर हा पुढील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ८,५५३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, २०२९ पर्यंत तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

घोडबंदर मार्गावरील तीव्र वाहतूककोंडी लक्षात घेऊन रस्त्याची रुंदी ३० मीटरवरून ६० मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे ५.५ ते ६ किलोमीटर लांबीच्या या काँक्रीट रस्त्यासाठी सुमारे १,२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पग्रस्त आदिवासींना शासकीय दराने भरपाई देण्याबरोबरच टीडीआर आणि एफएसआयच्या माध्यमातून पर्यायी सुविधा देण्यात येणार आहेत.

याशिवाय, ठाणे, मिरा-भाईंदर आणि नवी मुंबई येथे पॉड टॅक्सी प्रकल्प राबवण्याची तयारी सुरू असून हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारला जाणार आहे. पुढील सहा महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण केला जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी घोडबंदर मार्गावरील रुंदीकरणाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, महावितरणच्या वीज खांबांच्या स्थलांतरासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांची कामे पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.