शेतकऱ्यांची जमीन मोजणी आता फक्त १ हजारात पूर्ण होणार; महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा

    10-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)
नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमीन मोजणीची प्रक्रिया स्वस्त आणि वेगवान करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. आता शेतकऱ्यांना मोजणीसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊन केवळ १ हजार रुपये इतकाच राहणार आहे.

नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, यापूर्वी मोजणीसाठी शेतकऱ्यांना १० ते १२ हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत होता. मात्र भोगवटा महसूल निर्णयामुळे ही प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. खाजगी भूमापकांना परवानगी देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यांच्या कामावर सरकारी नियंत्रण राहणार आहे.

सध्या जमीन मोजणी पूर्ण होण्यासाठी जवळपास दोन महिने लागत असले तरी येत्या काळात ही प्रक्रिया फक्त १५ दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहेत. तसेच मोजणीनंतर खरेदीखत आणि नोंद बदल प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास भविष्यातील वाद टाळता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यवतमाळमधील वनहक्क दाव्यांबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ग्रामस्तरीय समित्यांनी मंजूर केलेल्या अर्जांचा सरकार फेरविचार करणार असून आदिवासी शेतकऱ्यांचे हक्क अबाधित राहतील, असे त्यांनी आश्वासन दिले.

दरम्यान, नागपूर शहरातील पाणी समस्येबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असून काही भागात अवैध पंपांच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी उचलले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारांवर कारवाई सुरू करण्यात आली असून, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

सीताबर्डी आणि महाल परिसरात मंजूर मर्यादेपेक्षा अधिक पाणी वापर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.