
Image Source:(Internet)
नागपूर : सावनेर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘डिफेन्स-न्यूक्लियर एरोस्पेस कॉरिडॉर’ प्रकल्पासाठी राज्य सरकारने जमीन संपादनाला मंजुरी दिल्यानंतर या बहुप्रतिक्षित योजनेला गती मिळण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निर्णयाचे स्वागत करत आमदार आशीष देशमुख यांनी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.
देशमुख म्हणाले की, या प्रकल्पामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाला चालना मिळेल तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित उद्योगांना बळकटी मिळेल. यासोबतच, विदर्भातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जमीन संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत असून प्रशासन स्तरावर हालचालींना वेग आला आहे. या प्रकल्पामुळे सावनेर परिसर औद्योगिक नकाशावर ठळकपणे उभा राहील आणि विदर्भाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.