मोठा दिलासा! आता ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; खासगी रुग्णालयांचाही मोठ्या प्रमाणात समावेश

    01-Apr-2026
Total Views |
 
Free treatment
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य क्षेत्रात मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्याwत आला आहे. राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना एकत्र करून रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार (Free treatment) देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या एकत्रित योजनेत आता तब्बल २,३९९ आजारांचा समावेश करण्यात आला आहे.
 
पूर्वी आयुष्मान भारत योजनेचा लाभ मर्यादित रुग्णालयांमध्येच मिळत होता. राज्यातील सुमारे १,७०० रुग्णालयांपुरती ही योजना मर्यादित होती आणि त्यातही बहुतांश रुग्णालये शासकीय होती. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याचा पर्याय अनेक रुग्णांसाठी बंदच होता.
 
मात्र आता परिस्थितीत मोठा बदल करण्यात आला आहे. शासनाने सुमारे २,८८० नव्या रुग्णालयांना मंजुरी दिली असून त्यात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णालयांची संख्या ४,५८० वर जाणार आहे. यामुळे रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यातीलच नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेणे शक्य होणार आहे.
 
या योजनेचा लाभ आता शुभ्र, केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डधारकांनाही मिळणार आहे. पूर्वी केवळ काही मर्यादित घटकांपुरतीच ही सुविधा होती. त्यामुळे अनेक गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहत होते. आता या बदलामुळे अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे.
 
सध्या राज्यातील सुमारे २,५०० रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार सुरू आहेत, तर उर्वरित रुग्णालयांची प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही महिन्यांत आणखी २,०८० रुग्णालयांचा समावेश होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख खासगी रुग्णालये या योजनेत सहभागी होतील.
 
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते या योजनेमुळे रुग्णांच्या उपचारावरील मोठा आर्थिक बोजा कमी होणार आहे. नागरिकांनी लवकरात लवकर ‘गोल्डन कार्ड’ काढून घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.