व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; एप्रिलच्या पहिल्याच दिवशी दरवाढीचा झटका

    01-Apr-2026
Total Views |
 
Commercial gas cylinders
 Image Source:(Internet)
मुंबई :
एप्रिल महिन्याची सुरुवातच महागाईच्या आणखी एका फटक्याने झाली असून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (Commercial gas cylinders) दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत तब्बल १९५ ते २१८ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे हॉटेल, ढाबे, केटरिंग व्यवसाय तसेच लहान उद्योजकांच्या खर्चात मोठी भर पडणार आहे.
 
या दरवाढीनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दिल्लीमध्ये १९ किलो सिलिंडरची किंमत आता २,०७८.५० रुपयांवर पोहोचली असून मुंबईत सुमारे २,०३१ रुपये, चेन्नईत २,२४६.५० रुपये आणि कोलकात्यात २,२०८ रुपये इतकी किंमत झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात झालेल्या या वाढीमुळे व्यावसायिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
महत्त्वाचे म्हणजे, घरगुती ग्राहकांसाठी मात्र सध्या दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. काही दिवसांपूर्वीच झालेल्या वाढीनंतर सध्या दर स्थिर ठेवण्यात आल्याने गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला आहे.
 
दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय कारणेही महत्त्वाची ठरत आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम एलपीजीच्या दरांवर होत आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या जागतिक बाजारातील चढ-उतार आणि परकीय चलनाचा दर लक्षात घेऊन नवीन दर जाहीर करतात. याच पार्श्वभूमीवर एप्रिलमध्येही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
 
व्यावसायिक गॅस सिलिंडर महागल्याने त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावरही पडण्याची शक्यता आहे. हॉटेलमधील जेवण, केटरिंग सेवा आणि अन्य खाद्यपदार्थांच्या दरात वाढ होण्याची चिन्हे दिसत असून महागाईचा भार आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.