भोंदू बाबा अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; अवघ्या ५ मिनिटांत सुनावणी

    01-Apr-2026
Total Views |
 
Ashok Kharat
 
नाशिक : राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात बुधवारी महत्त्वाची घडामोड घडली. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या खरातला आज कोठडीची मुदत संपल्याने नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष म्हणजे ही संपूर्ण सुनावणी अवघ्या पाच मिनिटांत पार पडली.
 
न्यायाधीश बी. एन. ईचपुराणी यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. यावेळी तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे उपस्थित होते. न्यायालयाने काही कागदपत्रांची पाहणी करत तपास अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि कोणताही सविस्तर युक्तिवाद न होता थेट न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला. हा निर्णय पहिल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने देण्यात आला असून उद्या दुसऱ्या गुन्ह्याबाबत पुन्हा सुनावणी होणार आहे.
 
दरम्यान, विशेष तपास पथकाकडून (SIT) खरातची सखोल चौकशी सुरू असून तो चार वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे समोर आले आहे. या मोबाईलमधील माहितीमुळे आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात हिचा सहभाग असल्याचा संशय असून ती सध्या फरार आहे. पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे.
 
अघोरी विद्या आणि दैवी शक्तींचा दावा करत खरातने अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून काही बड्या नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून आणखी पीडितांची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.