Image Source:(Internet)
मुंबई : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली.
याआधी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र अनेक महिलांना विविध कारणांमुळे प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नसल्याने शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी अद्ययावत करणे आवश्यक असून, ही शेवटची संधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अशोक खरात प्रकरणाबाबत भूमिका-
भोंदू अशोक खरात प्रकरणावर बोलताना आदिती तटकरे यांनी टीकेवर नाराजी व्यक्त केली. घटना घडल्यानंतर तत्काळ प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये आपणही होतो, असे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाच्या तपासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले असून, त्याचे नेतृत्व अनुभवी महिला अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे.
पीडित महिलांना न्याय मिळवून देणे हीच सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. दोषींना कोणतीही सूट न देता कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
विलिनीकरणाच्या चर्चांवर स्पष्टीकरण-
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चांबाबत तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. दादांच्या आयुष्यात आणि त्यांच्या निधनानंतर मांडण्यात आलेल्या विलिनीकरणाच्या मुद्द्यांमध्ये फरक असल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळात झालेल्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.
पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या विषयावर एकत्रित चर्चा झाली होती, मात्र अजित पवार गटात तशी समन्वयित चर्चा झाली नव्हती, असेही त्यांनी नमूद केले. सुनेत्रा तटकरे यांच्या नेतृत्वाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्यामुळेच संभ्रम अधिक वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.