पाकिस्तानमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये भीषण हिंसाचार; शिया समुदायावर गोळीबारात ३८ जणांचा मृत्यू

    07-Mar-2026
Total Views |

PakistanImage Source:(Internet) 
इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या (Pakistan) ताब्यातील गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात शिया समुदायावरील गोळीबाराच्या घटनेने परिस्थिती गंभीर झाली आहे. या गोळीबारात किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी गिलगिट-बाल्टिस्तानमधील प्रमुख शहर स्कार्दू येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू झाली होती. या आंदोलनात बाल्टी शिया समाजातील हजारो लोक सहभागी झाले होते. सुरुवातीला हे आंदोलन शांततेत सुरू होते; मात्र सुरक्षा दलांच्या कारवाईनंतर परिस्थिती अचानक बिघडली.
 
निदर्शकांना पांगवण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलांकडून गोळीबार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या गोळीबारात बाल्टी शिया समाजातील अनेक जण जखमी झाले, तर किमान ३८ जणांचा मृत्यू झाला. सुरुवातीला मृतांची संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र जखमींपैकी अनेक जण उपचारादरम्यान दगावल्याने मृतांचा आकडा वाढला.
 
ही बातमी पसरताच संपूर्ण प्रदेशात संतापाची लाट उसळली. संतप्त जमावाने अनेक ठिकाणी सरकारी इमारती आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले करत तोडफोड व जाळपोळ केली. त्यामुळे स्कार्दू आणि आसपासच्या भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
 
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने काही भागांमध्ये संचारबंदी लागू केली असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या घटनेमुळे गिलगिट-बाल्टिस्तानमधील दीर्घकाळापासूनचा असंतोष आणि राजकीय तणाव पुन्हा एकदा उघड झाला आहे.