भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यासाठी रेल्वेची विशेष व्यवस्था; मुंबई-अहमदाबाद दरम्यान खास गाड्या धावणार

    07-Mar-2026
Total Views |
 
T20 World Cup
 Image Source:(Internet)
मुंबई :
भारत आणि न्यूझीलंड (India-New Zealand) यांच्यातील टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी अहमदाबादकडे जाणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे क्रिकेट मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा सात धावांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. त्यामुळे ८ मार्च रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या भारत-न्यूझीलंड सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानांपैकी एक असलेल्या नरेंद्र मोदी मैदानावर हा ऐतिहासिक सामना रंगणार आहे.
 
विशेष वातानुकूलित जलदगती गाडी-
पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान विशेष वातानुकूलित जलदगती गाडी ७ मार्च रोजी रात्री ११.४५ वाजता मुंबईहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता अहमदाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी ९ मार्च रोजी पहाटे ३.०० वाजता अहमदाबादहून सुटून सकाळी ११.१५ वाजता मुंबई सेंट्रल येथे येईल.
 
या गाडीला बोरिवली, वापी, सुरत, भरुच आणि वडोदरा या स्थानकांवर थांबे असतील. प्रवाशांसाठी पहिल्या श्रेणीसह विविध वातानुकूलित डब्यांची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
 

आधुनिक सोयी असलेली आणखी एक गाडी-
याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक विशेष गाडी ८ मार्च रोजी सकाळी ६.२० वाजता मुंबईहून सुटेल आणि दुपारी १२.४० वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. या गाडीत विस्तीर्ण काचेच्या खिडक्या असलेले विशेष डबे, कार्यकारी श्रेणी तसेच वातानुकूलित आसन व्यवस्था असलेले डबे उपलब्ध असतील. सामना संपल्यानंतर ही गाडी दुपारी ३.१० वाजता अहमदाबादहून परतीचा प्रवास करणार आहे.
 
तिकीट आरक्षण सुरू-
या विशेष गाड्यांसाठी तिकीट आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली असून प्रवासी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा आरक्षण केंद्रांवरून तिकिटे घेऊ शकतात. क्रिकेटप्रेमींना अंतिम सामना पाहण्यासाठी सोयीस्कर प्रवास मिळावा, यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.