UPSC निकालात नागपूरची दमदार कामगिरी; प्रज्ज्वल नसरे आणि भाग्यश्री नाईकेले यांचे यश

    07-Mar-2026
Total Views |
 
UPSC
 Image Source:(Internet)
नागपूर :
प्रतिष्ठेच्या Union Public Service Commission (UPSC) नागरी सेवा परीक्षेत नागपूर आणि विदर्भातील दोन तरुणांनी उल्लेखनीय यश संपादन करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. प्रज्ज्वल नसरे आणि भाग्यश्री नाईकेले यांच्या मेहनतीमुळे त्यांच्या कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
 
प्रज्ज्वल नसरे याने UPSC परीक्षेत ६७७ वा क्रमांक मिळवत महत्त्वपूर्ण यश मिळवले. वर्धा जिल्ह्यातील कारंजा गाडगे तालुक्यातील ठाणेगाव या छोट्या गावातील प्रज्ज्वल हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील धनराज नसरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत.
 
प्रज्ज्वलने २०२३ मध्ये बीएची पदवी घेतली, तर २०२५ मध्ये राज्यशास्त्र विषयात एमए पूर्ण केले. शिक्षणानंतर त्याने नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. तिसऱ्या प्रयत्नात त्याने यश मिळवले. दुसऱ्या प्रयत्नात तो मुख्य परीक्षा आणि मुलाखतीपर्यंत पोहोचला होता; मात्र अंतिम निवड थोडक्यात राहिली होती. विशेष म्हणजे, कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता त्याने ऑनलाइन मार्गदर्शन आणि स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले.
 
दरम्यान, नागपूरच्या दिघोरी परिसरातील रहिवासी भाग्यश्री नाईकेले हिनेही UPSC परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिचे वडील राजेश नाईकेले हे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. साध्या कुटुंबातून आलेल्या भाग्यश्रीने प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली.
 
बीएससीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पूर्णवेळ UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. मागील वर्षी तिने UPSC परीक्षेत ७३७ वा क्रमांक मिळवत Indian Railway Management Service (IRMS) सेवेत निवड मिळवली. सध्या ती Hyderabad येथे प्रशिक्षण घेत आहे.
 
प्रशिक्षणादरम्यानही तिने पुन्हा परीक्षा देत आपला क्रमांक सुधारला आणि यावेळी ६४७ वा क्रमांक मिळवत आणखी मोठी कामगिरी केली. त्यांच्या या यशामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.