नागपूरच्या गंधे बंधूंची ‘MasterChef India’वर मोहोर; ट्रॉफीसह जिंकले २५ लाखांचे बक्षीस

    07-Mar-2026
Total Views |
 
MasterChef India
 Image Source:(Internet)
नागपूर :
देशातील लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शो MasterChef India च्या नवव्या पर्वाचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. या स्पर्धेत नागपूरचे विक्रम आणि अजिंक्य गंधे या मराठमोळ्या भावांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. त्यांच्या अनोख्या पाककौशल्यामुळे आणि कल्पक सादरीकरणामुळे त्यांनी परीक्षकांची मने जिंकत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या यशामुळे नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 
स्पर्धेदरम्यान गंधे बंधूंनी पारंपरिक भारतीय पदार्थांना आधुनिक शैलीत सादर करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या नावीन्यपूर्ण रेसिपी, उत्कृष्ट सादरीकरण आणि जबरदस्त टीमवर्कमुळे ते सुरुवातीपासूनच प्रेक्षक आणि परीक्षकांच्या पसंतीस उतरले होते.
 
या सीझनमध्ये प्रसिद्ध शेफ विकास खन्ना, रणवीर बेरार आणि कुणाल कपूर यांनी परीक्षकांची भूमिका बजावली. अंतिम सोहळ्यात नामांकित शेफ संजीव कपूर यांनीही विशेष उपस्थिती लावत विजेत्यांचे अभिनंदन केले.
 
विजेतेपद मिळाल्यानंतर विक्रम आणि अजिंक्य गंधे यांना ट्रॉफीसोबत २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘गोल्डन अप्रॉन’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
 
गंधे बंधूंची पार्श्वभूमी :
विक्रम गंधे (३१) यांनी नागपूरमधील सिटी प्रीमियर कॉलेजमधून वाणिज्य शाखेत शिक्षण घेतले आहे, तर अजिंक्य गंधे (२९) यांनी आर्किटेक्चरची पदवी मिळवली आहे. स्वयंपाकाची आवड जपताना त्यांनी पुढे स्वतःचा कॅफे सुरू केला. या आवडीमुळेच त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील मास्टर शेफ इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला आणि अखेर विजेतेपद मिळवत मोठी कामगिरी करून दाखवली.