नाशिकमध्ये पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; सुरगाणा तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    07-Mar-2026
Total Views |
 
Mild earthquake
 Image Source:(Internet)
नाशिक :
जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आज पुन्हा सौम्य भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भूकंपीय हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले. अंबरनाथ , निवारपाडा , चुली, राशा, गोंडाळविहीर आणि अलंगुण या गावांमध्ये भूकंपाचे धक्के अधिक जाणवले.
 
गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागात अशा प्रकारचे सौम्य धक्के वारंवार जाणवत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकांनी खबरदारी म्हणून रात्री घराबाहेर मोकळ्या जागेत किंवा शेतात मुक्काम करण्यास सुरुवात केली आहे.
 
दरम्यान, महसूल प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली असून नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कच्च्या किंवा मोडकळीस आलेल्या घरांमध्ये न राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 
उंबरठाण परिसर हा या भूकंपाच्या हालचालींचे केंद्रबिंदू असू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे येथे तातडीने भूकंपमापन यंत्र बसवावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.