Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
मध्यपूर्वेत वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होताना दिसत आहे. इराण, युनायटेट स्टेट्स आणि इजारेल यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज (७ मार्च २०२६) पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या (Domestic gas cylinder) किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या एलपीजी दरांमध्ये अचानक झालेल्या या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतही ११५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळींच्या खर्चात वाढ होणार असून बाहेरचे जेवणही महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलासह गॅसच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा थेट परिणाम भारतातील एलपीजी दरांवर झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की प्रधान मंत्री उज्ववला योजना अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे ३०० रुपयांचे अनुदान कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांना दरवाढीचा तुलनेने कमी फटका बसणार आहे.
तसेच स्थानिक कर आणि वाहतूक खर्चामुळे विविध शहरांमध्ये गॅस सिलिंडरच्या किमतीत काही रुपयांचा फरक असू शकतो, असेही अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.