Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारविरोधात काँग्रेसने (Congress) जोरदार टीका केली आहे. वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर या निर्णयामुळे अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे सामान्य कुटुंबांचे स्वयंपाकघराचे अर्थकारण बिघडत असून महागाईचा सर्वाधिक फटका मध्यमवर्ग आणि गरीबांना बसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
खरगे यांनी पुढे सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरले असतानाही त्याचा फायदा नागरिकांना देण्यात आला नाही. उलट आता दरवाढ करून सामान्य लोकांवर आर्थिक ओझे टाकले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जागतिक स्तरावरील तणावाच्या पार्श्वभूमीवर तेल, गॅस आणि खतांचा पुरेसा साठा राखण्यातही केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरूनही या निर्णयाचा निषेध करण्यात आला. पक्षाने म्हटले आहे की, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत थेट ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत सुमारे ११५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह छोट्या व्यावसायिकांनाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे तेल कंपन्यांनी एलपीजीच्या दरात वाढ केल्याचे सांगितले जात आहे. Indian Oil Corporation च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, दिल्लीत १४.२ किलो वजनाच्या घरगुती (नॉन-सब्सिडी) एलपीजी सिलेंडरची किंमत आता ९१३ रुपयांवर पोहोचली असून यापूर्वी ती ८५३ रुपये होती.
गेल्या वर्षभरातील ही दुसरी दरवाढ असून देशभरात स्वयंपाक गॅसच्या वाढत्या किमतींवरून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.