मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी मोठे पाऊल; महाराष्ट्रातील ५० बिबटे गुजरातच्या ‘वनतारा’ केंद्रात हलवणार

    07-Mar-2026
Total Views |
 
Leopards
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील वाढत्या मानव-बिबट्या (Leopards) संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागांत पकडण्यात आलेले सुमारे ५० बिबटे गुजरातमधील जामनगर येथील Vantara या अत्याधुनिक वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्रात हलवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
 
राज्यातील अनेक ग्रामीण तसेच निवासी भागांमध्ये बिबट्यांची वाढती वर्दळ आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मानवांचे संरक्षण करण्यासोबतच बिबट्यांचे संवर्धन करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
 
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी शुक्रवारी या निर्णयाला दुजोरा दिला. वनतारा केंद्राच्या व्यवस्थापनासोबत झालेल्या चर्चेनंतर बिबट्यांचे स्थलांतर करण्याबाबत सहमती झाल्याची माहितीही समोर आली आहे.
 
गेल्या काही महिन्यांत जुन्नर, नाशिक आणि अहमदनगर, या भागांत बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या काही घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
 
वन विभागाकडे पकडलेल्या बिबट्यांसाठी पुरेशी जागा आणि संसाधने नसल्यामुळे त्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून देणे आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, पुनर्वसन आणि सुरक्षित अधिवास असलेल्या वनतारा केंद्रात त्यांचे स्थलांतर करण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे.
 
या निर्णयामुळे एकीकडे मानव-बिबट्या संघर्ष कमी होण्यास मदत होईल, तर दुसरीकडे बिबट्यांचे संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.