नागपूरचा सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर आसाममध्ये शहीद!

    06-Mar-2026
Total Views |
 - सुखोई Su-30MKI लढाऊ विमान अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू

Purvesh DuragkarImage Source:(Internet) 
नागपूर :
आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील प्रशासनिक शिक्षण उड्डाणादरम्यान इंडियन एयर फोर्सच्या Sukhoi Su-30MKI या अत्याधुनिक लढाऊ विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नागपूरचे फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरूगकर (Purvesh Duragkar) शहीद झाले. या विमानात त्यांच्यासोबत असलेले स्क्वाड्रन लीडर अनुज यांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती वायुसेनेकडून देण्यात आली.
 
वायुसेनेच्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री सुमारे १ वाजून ९ मिनिटांच्या सुमारास प्रशिक्षण उड्डाण सुरू असताना विमानाचा ग्राउंड कंट्रोलशी अचानक संपर्क तुटला. काही वेळातच विमान रडारवरूनही गायब झाले. त्यानंतर तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. शुक्रवारी सकाळी अधिकृतरीत्या दोन्ही वैमानिक शहीद झाल्याची माहिती जाहीर करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात आले आहे.
 
नागपूरच्या न्यू सुभेदार लेआउटचा रहिवासी
२८ वर्षीय पूर्वेश दुरूगकर हे नागपूरमधील न्यू सुभेदार लेआउट परिसरातील रहिवासी होते. लहानपणापासूनच त्यांना विमान उड्डाण आणि तंत्रज्ञानाची आवड होती. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील Defence Services Academy Shahapur येथे शिक्षण घेतले. त्यानंतर नागपूरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथून २०१७ मध्ये बीएससी पदवी प्राप्त केली.
 
यानंतर त्यांनी AFCAT परीक्षा उत्तीर्ण करून Indian Air Force मध्ये प्रवेश मिळवला आणि फायटर पायलट म्हणून देशसेवेत दाखल झाले. त्यांच्या शिक्षकांच्या मते, पूर्वेश यांना बालपणापासूनच विमान उड्डाण आणि तांत्रिक प्रयोगांची विशेष आवड होती. ते स्वतः ड्रोन तयार करून त्यावर प्रयोग करत असत.
 
ऑपरेशनमध्येही बजावली होती भूमिका-
अलीकडेच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेतही पूर्वेश दुरूगकर यांनी फायटर पायलट म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या धाडसामुळे नागपूरकरांसह कुटुंबीयांनाही त्यांचा अभिमान होता.
 
कुटुंबीयांशी झालेले शेवटचे संभाषण-
पूर्वेश २० फेब्रुवारीला नागपूरला कुटुंबीयांच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांची बहीण सायली अमेरिकेत नोकरी करत असून त्या वेळी तीही भारतात आली होती. त्यांचे वडील रवींद्र दुरूगकर हे रेल्वेत लोको पायलट म्हणून कार्यरत होते, तर आई संध्या दुरुगकर गृहिणी आहेत. त्यांचा भाऊ रुपेश देखील भारतीय हवाई दलात कार्यरत आहे.
 
पूर्वेश नियमितपणे कुटुंबीयांशी व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे संपर्कात असत. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे घरच्यांशी बोलणे झाले होते आणि तेच त्यांचे शेवटचे संभाषण ठरले.
 
या दुःखद घटनेमुळे नागपूरसह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वीर सुपुत्राला सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहिली जात आहे.