अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच अजित पवारांना अभिवादन; मुख्यमंत्र्यांकडून दोन मोठ्या घोषणा

    06-Mar-2026
Total Views |
 
Fadnavis pay Greetings to Ajit Pawar
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्याचा सन २०२६–२७ चा अर्थसंकल्प (Budget) आज सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना दिवंगत उपमुख्यमंत्री व माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
 
अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या राज्याच्या अर्थकारणातील योगदानाचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, अजितदादांनी तब्बल ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केला होता. शिस्तप्रिय स्वभाव, जलद निर्णयक्षमता आणि कामातील वेग हीच त्यांची खरी ओळख होती, असे फडणवीस यांनी नमूद केले.
 
अजित पवार यांच्या कार्याचा सन्मान म्हणून राज्य सरकारतर्फे दोन महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रशासकीय क्षेत्रात आणि नागरी सेवांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व संस्थांना देण्यासाठी ‘अजित पवार गतिमान नागरी सन्मान’ हा नवा पुरस्कार सुरू केला जाणार आहे.
 
अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री काही क्षण भावूक झाले आणि “हा संपूर्ण अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित आहे,” असेही त्यांनी सांगितले. या घोषणेनंतर सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून निर्णयाचे स्वागत केले.