हिंगणा परिसरात चोरट्यांचा हैदोस; एका रात्रीत ५ बंगल्यांवर डल्ला, लाखोंचा ऐवज लंपास

    05-Mar-2026
Total Views |
 
Thieves
 Image Source:(Internet)
नागपूर :
शहराच्या हिंगणा (Hingna) भागात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटना वाढल्या असून सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी थेट पाच बंगल्यांना लक्ष्य करत मोठी चोरी केली. धनगरपुऱ्यातील हिंगणा टाऊन सोसायटीमध्ये कुलुपे तोडून रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
विशेष म्हणजे, हिंगणा पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक पोलिस उपनिरीक्षक संदेश नाळे यांच्या घराचाही या चोरीत समावेश आहे. त्यांच्यासह श्यामराव झाडे, राजेंद्र उदासी, कांतिलाल महाजन आणि आशिष जक्के यांच्या बंगल्यांमध्येही चोरट्यांनी प्रवेश करून ऐवज लंपास केला.
 
सकाळी उघडकीस आली घटना-
मंगळवारी सकाळी घरफोडीचा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासानंतर अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाळे वगळता इतर घरमालक बाहेरगावी असल्याची माहिती समोर आली आहे.
 
यापूर्वीही सलग घटना-
हिंगणा परिसरात यापूर्वीही घरफोड्यांच्या घटना घडल्या आहेत. १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री देशमुखवाडी येथे नायब तहसीलदार नरेंद्र दाते यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर १९ फेब्रुवारीला भोसलेवाडीमध्ये अजय धर्मपुरीवार यांच्या घरी चोरी झाली. सुधाकर बावीस्कर, पुरुषोत्तम राजने आणि विश्वास घनचक्कर यांच्या घरांमध्येही मागील महिन्यात घरफोडी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
 
सलग घडणाऱ्या या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, रात्रीच्या गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींचा शोध सुरू आहे.