Image Source:(Internet)
पटना :
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)च्या उमेदवारांसह राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या निर्णयामुळे राज्यातील सत्तासमीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.
संसदेत दोन्ही सभागृहांमध्ये प्रतिनिधित्वाची इच्छा
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नीतीश कुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच संसदेतल्या दोन्ही सभागृहांमध्ये तसेच बिहार विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यसभा सदस्य झाल्यानंतरही बिहारमधील नव्या सरकारला पाठिंबा देत राज्याच्या विकासासाठी काम सुरू ठेवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निशांत कुमार यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा-
दरम्यान, राजकीय वर्तुळात नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेशाबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्यांना पक्ष संघटनेत किंवा सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
विरोधकांचा जोरदार हल्लाबोल-
या घडामोडींवर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजपवर निशाणा साधत “महाराष्ट्र मॉडेल” बिहारमध्ये राबवले जात असल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, भाजपच्या दबावामुळेच नीतीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद सोडून राज्यसभेचा मार्ग स्वीकारावा लागला. सहयोगी पक्षांना कमकुवत करण्याची रणनीती भाजप अवलंबत असल्याचा दावाही त्यांनी केला.
समर्थकांमध्ये भावनिक वातावरण-
नीतीश कुमार राज्यसभेत जाणार असल्याची बातमी समोर येताच पटना येथील मुख्यमंत्री निवासाबाहेर समर्थकांची मोठी गर्दी झाली. अनेक कार्यकर्ते भावुक झाल्याचे दिसून आले. “नीतीश कुमार यांनी बिहारच्या सक्रिय राजकारणातून दूर जाऊ नये,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
एकूणच, राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने बिहारच्या राजकारणात नव्या घडामोडी घडत असून पुढील काही दिवसांत सत्तेच्या समीकरणांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.