Image Source:(Internet)
नागपूर :
शहराजवळील कोराडी (Koradi) परिसरात आज सकाळी घडलेल्या एका खूनप्रकरणाने खळबळ उडाली आहे. खापरखेड़ा–कोराडी मंदिर मार्गावर शेतकरी सेलिब्रेशन हॉलसमोर एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास एक महिला आणि एक युवक संबंधित व्यक्तीजवळ आले आणि क्षणात त्याच्यावर चाकूने सलग वार केले. अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, गुन्हा केल्यानंतर आरोपी महिला आणि युवक यांनी स्वतः पोलिस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केले. पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे.
हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पूर्वीचा वाद की अन्य काही कारण, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.