Image Source:(Internet)
पुणे :
जिल्ह्यातील शिरूर (Shirur) तालुक्यात गर्भलिंग निदानासाठी चक्क मोबाइल अॅपचा वापर करणाऱ्या ‘हायटेक’ रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीर तपासण्या केल्या जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही कारवाई केली.
या प्रकरणी ‘बीएएमएस’ शिक्षण घेतलेला डॉ. आकाश सुभाष मलगुंडे आणि एजंट नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली) यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पाचंगे वस्ती परिसरात सुरू असलेल्या या क्लिनिकमध्ये सापळा रचून प्रशासनाने कारवाई केली.
मोबाइल अॅपवरून गर्भलिंग तपासणी-
तपासादरम्यान सर्वांत धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे, गर्भलिंग निदानासाठी कोणतेही मोठे सोनोग्राफी यंत्र न वापरता मोबाइल अॅपच्या माध्यमातून तपासणी केली जात होती. एजंटमार्फत रुग्णांना संपर्क करून क्लिनिकमध्ये आणले जात होते. या पद्धतीने अनेक महिलांची तपासणी झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून तपास यंत्रणाही या प्रकाराने चकित झाली आहे.
बेकायदेशीर औषधसाठा जप्त-
छाप्यात क्लिनिकमधून गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर गोळ्यांचा साठा आढळून आला. तसेच ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याचे उल्लंघन करणारी कागदपत्रे, नोंदी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. संबंधित क्लिनिक सील करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई
ही धडक कारवाई आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले आणि शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन धस हेही कारवाईवेळी उपस्थित होते. क्राईम ब्रँच युनिट-७ चे डीसीपी राजेंद्र मुळीक आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले.
गर्भलिंग निदानासारख्या सामाजिकदृष्ट्या गंभीर आणि कायद्याने बंदी असलेल्या प्रकारासाठी आता तंत्रज्ञानाचा गैरवापर होत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. या रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.