Image Source:(Internet)
मुंबई :
राज्याच्या राजकीय पटावर पुढील दोन महिने चांगलीच खळबळ उडणार आहे. महाराष्ट्र (Maharashtra) विधिमंडळात एकूण १६ नव्या सदस्यांची एन्ट्री होणार असून सत्ताधारी आणि विरोधकांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये १४ जागा महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी तर २ जागा महाराष्ट्र विधानसभा पोटनिवडणुकांद्वारे भरल्या जाणार आहेत.
विधानपरिषदेतील नऊ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपुष्टात येत असल्याने एप्रिलच्या मध्यावर निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांची रिक्त झालेली जागा देखील या प्रक्रियेत भरली जाणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील संख्याबळाचा ताळमेळ पुन्हा जुळवण्याचे आव्हान सर्वच पक्षांसमोर उभे राहिले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था कोट्यातील पुणे, सोलापूर, सांगली–सातारा तसेच रायगड–रत्नागिरी–सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्येही हालचालींना वेग आला आहे. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अंतिम टप्प्यात असून निवडणूक कार्यक्रमाबाबत लवकरच स्पष्टता येण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटी वाढवत प्रचारयंत्रणा सक्रिय केली आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली आहे. नियमानुसार सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे आवश्यक असल्याने प्रक्रिया गतीमान झाली आहे. या जागेसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले यांचे नाव चर्चेत असल्याने स्थानिक राजकारणात उत्सुकता वाढली आहे.
बारामती मतदारसंघातही संभाव्य पोटनिवडणुकीची चर्चा सुरू असून मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्येही निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघ तसेच नागपूर, संभाजीनगर आणि पुणे पदवीधर मतदारसंघातील सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबरला संपणार असल्याने दिवाळीपूर्वी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते.
एकंदरित, पुढील काही आठवडे राज्याच्या राजकीय घडामोडींसाठी निर्णायक ठरणार आहेत. विधानसभा आणि विधानपरिषदेत होणाऱ्या या निवडणुकांमुळे नव्या समीकरणांची चाचपणी होईल, तर अनेक इच्छुकांच्या राजकीय भवितव्यावरही शिक्कामोर्तब होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासमीकरणात बदल घडतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.