- जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर
Image Source:(Internet)
मुंबई :
राज्य शासनाने नागपूरच्या प्रशासकीय यंत्रणेत महत्त्वाचा बदल करत डॉ. विपीन इटनकर (Dr Vipin Itankar) यांची नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने ५ मार्च २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले. आयुक्तपद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत रूपांतरित करून त्यावर ही नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.
महापालिका निवडणुकांनंतर नव्या सत्ताधाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. यापूर्वी आयुक्त म्हणून कार्यरत असलेले अभिजित चौधरी यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
डॉ. इटनकर सध्या नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून, पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांची अतिरिक्त जबाबदारी कायम राहणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासोबतच महापालिका कारभाराची सूत्रेही त्यांच्या हाती असतील.
शासनाच्या आदेशानुसार नव्या पदाचा कार्यभार तातडीने स्वीकारणे बंधनकारक असून त्याची नोंद संबंधित ऑनलाइन प्रणालीमध्ये करावी लागणार आहे. तसेच कार्यभार हस्तांतरणासंदर्भातील शासन नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गोपनीय अहवाल सादरीकरण, कार्यमूल्यांकन प्रक्रिया आणि ई-प्रणालींचा वापर यावरही विशेष भर देण्यात आला आहे.
डॉ. इटनकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर महापालिकेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरातील विकास प्रकल्प आणि नागरिक सेवांमध्ये सुधारणा होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.