Image Source:(Internet)
नागपूर :
होळीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ‘नो लिकर डे’दरम्यान अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. नागपूर (Nagpur) एमआयडीसी पोलिस स्टेशन यांच्या पथकाने संघर्ष नगर परिसरात छापा टाकून २८३ दारूच्या बाटल्या जप्त केल्या. जप्त मालाची अंदाजित किंमत १२ हजार ९६० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
३ मार्च रोजी पार पडलेल्या या कारवाईत श्यामराव आर. विमलकर या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. कोणतीही वैध परवानगी नसताना दारूची विक्री करत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम मधील कलम ६५ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त साठा पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस उपायुक्त (झोन-१) ऋषिकेश रेड्डी यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात आली. सणासुदीच्या काळात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.