Image Source:(Internet)
मुंबई :
मध्यपूर्वेत पेटलेल्या इराण–इस्रायल (Iran-Israel) संघर्षाचे पडसाद आता मुंबईपर्यंत उमटले आहेत. ओमानच्या मस्कत किनारपट्टीजवळ गल्फ ऑफ ओमानमध्ये एका मालवाहू ऑईल टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय दीक्षित सोलंकी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मार्शल आयलंड्स ध्वज असलेल्या ‘MKD Vyom’ या ऑईल टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या मानवरहित बोटीने (Unmanned Surface Vessel) हल्ला केला. हा टँकर मस्कत किनारपट्टीपासून सुमारे ५२ नॉटिकल मैल अंतरावर होता. ड्रोन बोटीच्या धडकेत जहाजाच्या इंजिन रूममध्ये भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर आग भडकली. या आगीत दीक्षित सोलंकीचा जागीच मृत्यू झाला.
मूळचा दीव (गुजरात) येथील असलेला दीक्षित काही वर्षांपूर्वी रोजगाराच्या निमित्ताने मुंबईत आला होता. तो कांदिवली येथे वास्तव्यास होता आणि जहाजावर क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. महिनाभरापूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. अंत्यसंस्कारानंतर तो पुन्हा कर्तव्यावर रुजू झाला; मात्र नियतीने त्याच्यावर काळाचा घाला घातला.
दरम्यान, या घटनेच्या आदल्या दिवशी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत ‘MV Skylight’ या जहाजावरही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या जहाजावर कार्यरत असलेले बिहारचे आशिष कुमार आणि राजस्थानचे दलीप सिंग हे दोघे भारतीय खलाशी मागील ४८ तासांपासून बेपत्ता आहेत. शोधमोहीम सुरू असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे जागतिक सागरी मार्ग अधिक असुरक्षित होत चालले आहेत. भारतीय खलाशांची सुरक्षा, विमा संरक्षण आणि केंद्र सरकारची तातडीची हस्तक्षेपात्मक भूमिका याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईतील दीक्षितच्या मृत्यूने या आंतरराष्ट्रीय संघर्षाची झळ किती खोलवर पोहोचू शकते, याची जाणीव पुन्हा एकदा देशाला करून दिली आहे.