नागपूर :
राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने (BJP) राजकीय गणित बदलणारा निर्णय घेत नागपूरच्या माया इवनाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याआधी नवीन राणा आणि विजया राहटकर यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, अचानक इवनाते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माया इवनाते या नागपूरच्या माजी महापौर असून सध्या महापालिकेच्या विद्यमान सदस्या आहेत. अलीकडील निवडणुकीत त्यांनी विजय संपादन केला होता. आदिवासी समाजातील प्रभावी नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगावर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यामुळे आदिवासी समाजातून महिला प्रतिनिधी राज्यसभेत पाठवण्याचा भाजपचा विचार स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, इवनाते यांच्यासह रामदास आठवले, विनोद तावडे आणि रामराव वडकुते यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत गुरुवार (ता. ५) असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख शनिवार (ता. ७) आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
राजकीय चर्चेनुसार, इवनाते या द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. आदिवासी समाजातील प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
भाजपच्या या निर्णयामुळे राज्यसभा निवडणुकीत नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.