Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने (BJP) महाराष्ट्रातील उमेदवारांची अधिकृत घोषणा करत राजकीय वातावरण तापवले आहे. पक्षाकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असल्याची चर्चा असलेल्या विनोद तावडे यांचा ‘वनवास’ अखेर संपल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राष्ट्रीय महासचिव म्हणून पक्षसंघटनेत महत्त्वाची भूमिका बजावत असताना आता त्यांना संसदेच्या उच्च सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
आदिवासी नेतृत्वाला प्राधान्य
माया चिंतामण इवनाते या विदर्भातील खंबीर आदिवासी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. विशेषतः नागपूर-चंद्रपूर पट्ट्यात त्यांनी आदिवासी प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे. त्या National Commission for Scheduled Tribesच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. या पदावर असताना त्यांनी देशभर दौरे करून आदिवासी हक्कांबाबत महत्त्वाचे अहवाल सादर केले होते.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील पुनर्वसन, मूलभूत सुविधा आणि वनहक्कांच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रभावी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यसभेची उमेदवारी ही आदिवासी मतपेढी मजबूत करण्याच्या भाजपच्या रणनीतीचा भाग मानली जात आहे.
मराठवाडा आणि धनगर समाजावर लक्ष
रामराव वडकुते हे मराठवाड्यातील अनुभवी नेते असून धनगर समाजाचे प्रमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. 2019 पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. जून 2014 मध्ये त्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्ती झाली होती. पक्षसंघटनातील अनुभव आणि समाजातील पकड लक्षात घेता भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
आठवले यांची पुनर्रचना
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पुन्हा एकदा संधी देत भाजपने दलित-बहुजन समीकरण कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची राज्यसभा कारकीर्द संपत असताना त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य
शरद पवार (श. प. गट)
रामदास आठवले (रिपाई)
फौजिया खान (श. प. गट)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे गट)
धैर्यशील पाटील (भाजप)
भागवत कराड (भाजप)
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक
5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
6 मार्च – अर्जांची छाननी
9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी
राज्यसभेच्या या निवडणुकीत भाजपने सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि दलित-आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देत पक्षाने आगामी राजकीय समीकरणांवर स्पष्ट लक्ष केंद्रीत केले आहे. महाराष्ट्रातील या लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.