खरबी-खापा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, दोन मित्रांची प्रकृती गंभीर

    04-Mar-2026
Total Views |
 
Kharbi-Khapa highway Youth dies
 Image Source:(Internet)
तुमसर :
धुलीवंदनाच्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या उत्सवावर काळाने घाला घातला. खापा–खरबी राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने (Car) दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले. वाढदिवस अवघ्या तीन दिवसांवर असताना प्रशांत पुरूषोत्तम कांबळे या तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याने खरबी गावात शोककळा पसरली आहे.
 
प्रशांत कांबळे हा आपल्या मित्रांसह दुचाकीने गावाकडे परतत असताना खरबी शिवारातील एका ढाब्यासमोर समोरून येणाऱ्या एमएच ३५ एजी ८११७ क्रमांकाच्या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की प्रशांतचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेले विकास अशोक गोमासे आणि भूषण गजानन सिंगनजुडे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
घटनास्थळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकांमुळे मार्ग अरुंद झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. धडक देणारी कार तिरोडा येथील ‘बचवानी’ नावाच्या कंत्राटदाराची असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
 
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी काही काळ महामार्गावर ठिय्या देत आंदोलन केले. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. मोहाडी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत नागरिकांशी चर्चा केली आणि मागण्यांवर सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
 
दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. खरबी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात प्रशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे आणि उपनिरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस करत आहेत.