Image Source:(Internet)
आरमोरी :
रंगपंचमीच्या जल्लोषात न्हालेलं वातावरण काही क्षणांतच शोकाकुल झालं. मित्रांसोबत रंग खेळल्यानंतर आंघोळीसाठी वैनगंगा (Wainganga) नदीत उतरलेल्या २५ वर्षीय तरुण अभियंत्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे आरमोरी शहरासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
शुभम नामदेव रामटेके (रा. गायकवाड चौक, आरमोरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सकाळी रंगोत्सव साजरा केल्यानंतर शुभम आणि त्याचे मित्र नदीपात्रात गेले होते. पोहत असताना नदीच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला.
मित्रांनी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, मात्र पाण्याचा वेग आणि खोलीमुळे त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवली आणि काही वेळानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेने रामटेके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शुभमने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले होते. त्याचे वडील नामदेव रामटेके हे भंगार व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हलाखीच्या परिस्थितीत मुलाला उभं करण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच शुभमची एका प्रतिष्ठित कंपनीत नियुक्ती झाली होती. कुटुंबाचा आधार बनण्याआधीच त्याचा असा अंत झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या दुःखद प्रसंगात आणखी एक गंभीर प्रश्न पुढे आला आहे. आरमोरी येथील वनविभागाच्या डेपोमध्ये जळाऊ लाकडांची टंचाई निर्माण झाल्याने अंत्यसंस्कारासाठी आवश्यक लाकडे मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांना शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मेंडकी (ता. ब्रह्मपुरी) येथे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे. तरुणाच्या मृत्यूने शहर शोकमग्न असतानाच मूलभूत सुविधांच्या कमतरतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.