
Image Source:(Internet)
नागपूर : शहरात वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांदरम्यान नागपूर क्राइम ब्रांचने महत्त्वाची कामगिरी बजावत बसमध्ये ज्येष्ठ महिलेची मंगळसूत्र व दागिने चोरी करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही घटना १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.२५ ते ३.४५ दरम्यान घडली. ६६ वर्षीय मनोरमा सुधाकरराव अडम या आपल्या अपंग पती आणि नातीसह बिशप कॉटन स्कूल बसथांब्यावरून मंगळवारी चौकाकडे जाणाऱ्या (MH-49 BZ-2503) शहर बसमध्ये प्रवास करत होत्या. याच दरम्यान अज्ञात आरोपींनी त्यांच्या पिशवीतून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ६०,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान क्राइम ब्रांचच्या चेन स्नॅचिंग पथकाने अजनी परिसरातून चार आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मंजू सिद्धार्थ हाटगले (४०), सुहानी विशाल हाटगले (२२), सुरेखा विराज लोंढे (२३) आणि सुनील शेषराव कटोले (५२) यांचा समावेश आहे. चौघांनी मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.
आरोपींकडून सुमारे १.४ लाख रुपये किमतीचे १० ग्रॅम सोनं पोलिसांनी जप्त केले.ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास सुरू आहे.