राज्यात अवकाळीचा कहर! 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा

    31-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

राज्यात सध्या हवामानाने अनपेक्षित वळण घेतले असून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज गारपिटीसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर उर्वरित राज्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मार्च महिन्याचा शेवटचा दिवस असतानाही पावसाची तीव्रता कमी होताना दिसत नाही. परभणी, बीड, जळगाव, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीचा धोका अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सकाळपासूनच अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अचानक पावसाने जोरदार आगमन केले. मालेगाव, मनमाड, सटाणा आणि कळवण परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या, तर काही भागात गारपीटही झाली.

या अनिश्चित हवामानामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. काढणीच्या टप्प्यात असलेल्या पिकांवर या पावसाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कांदा, डाळिंब आणि मका या पिकांना विशेष फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, धुळे जिल्ह्यातही गारपिटीने कहर केला आहे. पश्चिम पट्ट्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर तसेच धुळे तालुक्यातील कुसुंबा परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील कांदा, मका, ज्वारी आणि बाजरी यांसारख्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.