मुंबईत सायन रुग्णालयात आग; एक्स-रे विभागात धूर, रुग्णांना सुरक्षितस्थळी हलवले

    31-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : शहरातील सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात (सायन रुग्णालय) मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एक्स-रे विभागात लागलेल्या या आगीमुळे परिसरात दाट धूर पसरला आणि रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ११:५७ वाजताच्या सुमारास ओपीडी आणि रेडिओलॉजी विभागात मोठी गर्दी असताना ही घटना घडली. एक्स-रे मशीनजवळून अचानक धूर निघू लागल्याने आग भडकली. प्राथमिक अंदाजानुसार, एसी यंत्रणा किंवा विद्युत तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी.

घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ फायर अलार्म वाजवून अग्निशमन दलाला कळवले. काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. धुराचे प्रमाण जास्त असल्याने रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आव्हानात्मक होते. मात्र, कर्मचारी आणि अग्निशमन जवानांनी समन्वय साधत रुग्णांना स्ट्रेचर व व्हीलचेअरच्या मदतीने दुसऱ्या विभागात हलवले.

सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

दरम्यान, आगीमुळे एक्स-रे विभागातील काही उपकरणे आणि फर्निचरचे नुकसान झाले आहे. या घटनेच्या कारणांचा तपास करण्यासाठी अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून, विस्कळीत झालेल्या रेडिओलॉजी सेवा लवकरच पूर्ववत केल्या जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.