Image Source:(Internet)
मुंबई :
राज्य प्रशासनात व्यापक स्तरावर फेरबदल करत सरकारने ३१ मार्च २०२६ रोजी आयएएस अधिकाऱ्यांच्या (IAS officers) बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत. मुख्यमंत्री कार्यालय, वित्त, कृषी, आपत्ती व्यवस्थापन आणि मुंबई महापालिकेसह अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये हे बदल करण्यात आले आहेत.
या फेरबदलांत वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून प्रशासनात कामकाजाला वेग देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळातही हालचाली वाढल्या आहेत.
आदेशानुसार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची बदली करून त्यांची नियुक्ती मुंबईत मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांना मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कृषी विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांना वित्त विभागात (वित्तीय सुधारणा) अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांची बदली मृद व जलसंधारण विभागात करण्यात आली आहे.
पोकरा प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यांना कृषी विभागाचे सचिवपद देण्यात आले असून दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याशिवाय, लहु माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माणिक गुरसळ यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिवपद सोपवण्यात आले आहे.
राज्य कर विभागातील संयुक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्यव्यवसाय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली असून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे.
या बदलांमुळे प्रशासनात नव्या ऊर्जेसह कामकाजाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.