
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : मिडल ईस्टमध्ये सुरू असलेला संघर्ष अधिकच तीव्र होत असून त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. गेल्या 32 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हल्ला केल्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी सतत क्षेपणास्त्र हल्ले सुरू असून अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचे मोठे नुकसान झाले आहे. युद्धविरामासाठीचे प्रयत्नही अद्याप अपयशी ठरत आहेत.
31 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी झपाट्याने उसळी घेतली. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 116.50 डॉलरच्या पुढे गेला असून जून 2022 नंतरचा हा उच्चांक मानला जात आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा देत तणावात आणखी भर घातली आहे. इराणच्या खार्ग बेटावर नियंत्रण मिळवण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या बेटावरून इराणचा सुमारे 90 टक्के तेल निर्यात होते. तसेच, होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवल्यास अमेरिका कठोर कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तज्ज्ञांच्या मते, मार्च महिन्यातच कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये 50 ते 60 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. जगातील सुमारे 20 टक्के तेल पुरवठा होर्मुझ सामुद्रधुनीतून होतो. त्यामुळे या मार्गावर परिणाम झाल्यास जागतिक पुरवठा साखळीवर मोठा ताण येत आहे.
परिस्थिती लवकर नियंत्रणात आली नाही, तर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 150 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात असून त्यामुळे महागाई आणि आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.