Image Source:(Internet)
नागपूर : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत (Result) उत्सुकता वाढली आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी सध्या आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडलेल्या या परीक्षांनंतर निकाल कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत यंदा बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान घेण्यात आली होती. परीक्षेनंतर आता मूल्यमापन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर येत आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. साधारण १५ मेच्या सुमारास निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर दहावीचा निकालही जाहीर केला जाणार असून, बारावीच्या निकालानंतर ८ ते १५ दिवसांत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
यामुळे दहावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला जाहीर होऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सीट नंबर व इतर आवश्यक माहितीच्या आधारे आपला निकाल पाहू शकतील.