Image Source:(Internet)
सातारा : जिल्ह्यातील कराड (Karad) तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीत सोमवारी सकाळी भीषण स्फोटांची मालिका घडून मोठी आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साई राम केमिकल कंपनीत झालेल्या या स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. कंपनीत कामगार येण्याच्या वेळेआधीच स्फोट झाल्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.
स्फोटानंतर एकामागून एक असे तीन ते चार जोरदार स्फोट झाले. या स्फोटांची तीव्रता इतकी मोठी होती की त्याचे धक्के तब्बल दहा किलोमीटरपर्यंत जाणवल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतरही कंपनीतील रसायनांनी भरलेल्या बॅरल्सचे स्फोट काही काळ सुरूच होते.
या स्फोटांमुळे कंपनी परिसरात भीषण आग भडकली असून रसायनांच्या बॅरल्स फुटल्याने मोठ्या प्रमाणावर ज्वाला आणि दाट धूर पसरला आहे. त्यामुळे आग अधिकच तीव्र होत गेल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. सध्या सहा ते सात अग्निशामक बंबांच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे कराडसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.