जनगणनेत मोठा बदल? लिव्ह-इन जोडप्यांची ‘विवाहित’ म्हणून नोंद होण्याची शक्यता

    30-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : देशातील सामाजिक बदल लक्षात घेऊन केंद्र सरकार जनगणनेत महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांचा समावेश ‘विवाहित’ या गटात करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

२०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी तयार होत असलेल्या नव्या धोरणात हा बदल सुचवण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ कायदेशीर विवाह केलेल्या व्यक्तींनाच ‘विवाहित’ म्हणून नोंद केली जात होती. मात्र, आधुनिक जीवनशैली आणि बदलत्या सामाजिक मूल्यांचा विचार करून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

या निर्णयामागे महिलांचे आणि मुलांचे हक्क सुरक्षित ठेवण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना अधिकृत ओळख मिळावी आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी हा बदल उपयुक्त ठरू शकतो.

तसेच, देशात अशा प्रकारच्या संबंधांची वाढती संख्या लक्षात घेता त्याची अचूक आकडेवारी गोळा करणेही आवश्यक ठरत आहे. त्यामुळे कुटुंब संरचनेबाबत अधिक स्पष्ट आणि वास्तव माहिती सरकारला मिळू शकते.

दरम्यान, २०२७ ची जनगणना मोठ्या प्रमाणात डिजिटल स्वरूपात होण्याची शक्यता असून नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते.