शिक्षण विभागात मोठी भरती; १७,५०० शिक्षकेतर पदे भरणार

    30-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेत सरकारने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मोठ्या भरतीला हिरवा कंदील दिला आहे. लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा विविध पदांसाठी सुमारे १७,५०० जागा लवकरच भरल्या जाणार आहेत.

दीर्घकाळापासून रखडलेली ही भरती आता मार्गी लागणार असून, २००५ नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षकेतर भरती होणार आहे. या अभावामुळे शाळांमध्ये प्रशासकीय कामाचा ताण वाढला होता. नव्या निर्णयामुळे अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना मोठा आधार मिळणार आहे.

सुधारित आकृतीबंधानुसार कनिष्ठ लिपिक पदांची संख्या सर्वाधिक ठेवण्यात आली आहे. त्यानंतर वरिष्ठ आणि मुख्य लिपिक पदे पदोन्नतीद्वारे भरली जाणार आहेत. याशिवाय, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठीही मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे.

पात्रतेबाबत, कनिष्ठ लिपिकासाठी कोणत्याही शाखेतील पदवी अनिवार्य असेल, तर वरिष्ठ व मुख्य लिपिक पदांसाठी किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक राहणार आहे. यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध होईल.

सरकारने १०० टक्के नामनिर्देशन पद्धतीने ही भरती करण्याचा निर्णय घेतला असून, अनुपातानुसार पदांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या भरतीचा सकारात्मक परिणाम शिक्षकांवरही होणार असून, शिक्षकेतर कामांचा ताण कमी झाल्याने शिक्षकांना अध्यापनावर अधिक लक्ष देता येणार आहे. मात्र, चतुर्थ श्रेणी पदे रद्द केल्यामुळे शाळांतील सुरक्षेबाबत काही प्रश्न निर्माण झाले आहेत.