मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; बावनकुळे यांचा वडेट्टीवारांना खुला इशारा

    30-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना थेट इशारा दिला आहे. मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांचे अशोक खरात यांच्याशी संबंध असल्याचा आरोप करत असाल, तर त्याबाबत ठोस आणि विश्वासार्ह पुरावे सरकार किंवा तपास यंत्रणांकडे द्यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

वडेट्टीवार यांच्या आरोपांमुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, केवळ माध्यमांमध्ये विधान करून किंवा आरोप लावून काहीही साध्य होत नाही. गंभीर स्वरूपाच्या आरोपांसाठी अधिकृत तक्रार आणि पुरावे आवश्यक असतात.

ते म्हणाले, सरकार या प्रकरणाची दखल घेत असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. मात्र, कोणत्याही व्यक्तीची बदनामी करण्यापूर्वी पुरावे असणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

संवेदनशील प्रकरणांमध्ये सार्वजनिक विधान करताना जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलणे टाळावे, कारण त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो, अशीही त्यांनी सूचना केली.

याशिवाय, विविध राजकीय नेते एकत्र दिसण्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, सामाजिक आणि वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे हे सामान्य आहे आणि त्याला राजकारणाशी जोडू नये.

दरम्यान, राज्यात इंधन व खतांच्या कमतरतेबाबत पसरत असलेल्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावले. पुरेसा साठा उपलब्ध असून, कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांना दिलासा देताना त्यांनी स्पष्ट केले की, सरकार पूर्णपणे सतर्क असून कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही.