गडचिरोलीत भीषण अपघात; लग्नाच्या वरातीवर दुर्दैवी संकट, ५ जणांचा मृत्यू

    30-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी मार्गावर सोमवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात लग्नाच्या वरातीवर काळाने घाला घातला. स्कॉर्पिओ आणि प्रवासी बस यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना कुरुड-कढोली गावाजवळील नाल्याजवळच्या तीव्र वळणावर सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, MH 46 P 5392 क्रमांकाची स्कॉर्पिओ ही रामपूर येथून लग्न समारंभ आटोपून भाडभीडी मोकासा येथे परतत होती. या वाहनात एकूण १६ जण प्रवास करत होते.

दरम्यान, गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणारी MH 15 CK 5005 क्रमांकाची प्रवासी ट्रॅव्हल्स समोरून येत असताना वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत स्कॉर्पिओचे मोठे नुकसान झाले असून काही प्रवासी वाहनातच अडकले होते.

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असताना दोघांचा वाटेतच मृत्यू झाला, तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.