पुण्यात भोंदूगिरीचा कळस; ‘महादेवाचा अवतार’ सांगत महिलेवर अत्याचार, मांजरी परिसर हादरला

    28-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे शहरातील मांजरी परिसरात अंधश्रद्धेचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे भासवून एका व्यक्तीने महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. सुरुवातीला हा गुन्हा वसई-विरार परिसरातील माणिकपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. तेथून शून्य क्रमांकाने नोंदवलेला गुन्हा २७ तारखेला पुण्यात पाठवण्यात आला. त्यानंतर मांजरी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नियमित नोंद करण्यात आली.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने धार्मिक विधी आणि पूजा-अर्चेच्या नावाखाली तिच्याशी जवळीक साधली. तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप असून, या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम ६४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात असे समोर आले की, आरोपी आणि पीडित महिला यांची ओळख ऑक्टोबर २०२३ मध्ये एका समाजमाध्यमाच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर संदेश पाठविण्याची सेवा, दूरध्वनी व दृश्य संभाषणाच्या माध्यमातून दोघांमध्ये संपर्क वाढत गेला. या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने भोंदूगिरी करत महिलेची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

सध्या पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही महिलांची फसवणूक झाली आहे का याचा तपास सुरू आहे. अंधश्रद्धेच्या आहारी न जाता सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.