
Image Source:(Internet)
पुणे : पोलिस होण्याचं स्वप्न मनात बाळगून मैदानात उतरलेल्या एका तरुणाचा धावताना अचानक मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना आज शनिवारी सकाळी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घडली. या घटनेने संपूर्ण भरती प्रक्रियेत शोककळा पसरली आहे.
पुरुषोत्तम बारकुल (वय २३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. सध्या पुण्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत तो सहभागी झाला होता. मैदानी चाचण्यांच्या टप्प्यात १६०० मीटर धावण्याची स्पर्धा सुरू असताना पुरुषोत्तमने उत्साहात धावायला सुरुवात केली. त्याने सलग तीन फेऱ्या पूर्ण केल्या, मात्र चौथ्या फेरीदरम्यान अचानक त्याला झटका आला आणि तो मैदानावरच कोसळला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या उमेदवारांनी आणि अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. वैद्यकीय पथकाने प्राथमिक तपासणी केली असता त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं स्पष्ट झालं. त्याचे हृदयाचे ठोके मंदावल्याने त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं.
या घटनेमुळे भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. पोलिस दलात दाखल होण्याचं स्वप्न घेऊन मेहनत करणाऱ्या या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.